सोलापूर दि. (१७) – प्रतिनिधी.
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)अंतर्गत म्हाडातर्फे उभारण्यात आलेल्या दहिटणे येथील राष्ट्र तेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेअंतर्गत १ हजार १२८ आणि शेळगी येथील श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रीय समाज महालक्ष्मी गृहनिर्माण सहकारी संस्थेअंतर्गत २२० अशा एकूण १ हजार ३४८ सदनिकांच्या वितरण प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सर्वश्री विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, समाधान आवताडे, दिलीप सोपल, सचिन कल्याणशेट्टी, अभिजित पाटील, देवेंद्र कोठे, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर आदी उपस्थित होते.
फोटो ओळ – दहिटणे येथील कामगारांना सदनिका वितरण प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, सोलपूरमध्ये बंद जलवाहिनीने पाणी आणण्यात येणार आहे. सांडपाणी प्रकल्पाच्या जागेचा प्रश्न दूर करण्यात आला असून ते कामही सुरू करण्यात आले आहे. शहरातील जल वितरण वाहिनीच्या ८५० कोटीच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. सोलापूर शहरातील नागरिकांना दररोज शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे असे प्रयत्न करण्यात येत आहेत. विमानतळाचे अतिरिक्त कामही लवकरच करण्यात येणार आहे. या प्रकल्पाला अटल बांधकाम योजनेतून २ लाख रुपये देण्यात आले. हरितपट्टयात मान्यता दिल्याने जागेची किंमत कमी झाली, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनुदान मिळाले. त्यामुळे लाभार्थ्याला कमी दरात घरकूल उपलब्ध झाले आहे. लाभार्थ्याला घरभाड्या एवढाच बँकेचा हप्ता भरावा लागणार आहे आणि घर त्याच्या नावाने होईल असे नियोजन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केवळ सोलापूरमध्ये ४८ हजार घरांचे नियोजन करण्यात आले आहे, त्यापैकी २५ हजार घरांचे काम पूर्ण करण्यात आले. २० हजार घरांचे नगारिकांना वितरण करण्यात आले आणि उर्वरीत घरांचे काम सुरू आहे. याकरिता प्रधानमंत्री महोदयांनी १ हजार कोटी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गरिबाच्या घराचे स्वप्न पुर्ण करता येणार आहे.
ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३० लाख घरकुलांना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे २०१८ पर्यंत प्रतिक्षा यादीतील सर्व नागरिकांना घरे देण्यात येणार आहे. देशात सर्वाधिक वेगाने घरे ग्रामविकास विभागामार्फत उभारण्यात येत आहेत. २० लाखापेक्षा अधिक घरांचे काम सुरू करण्यात आले आहे. पुढील दोन वर्षात सर्व ३० लाख कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण होईल. २०१८ च्या यादीतून सुटलेल्या नागरिकांसाठी नव्याने नोंदणी करण्याची परवानगी मिळाल्याने त्यांनाही लवकरच केंद्र सरकारच्या माध्यमातून घरकूल मिळेल. महाराष्ट्र हे पहिले बेघरमुक्त राज्य करायचे आहे. या ३० लाख घरांना केंद्र सरकारच्या अनुदानासोबत राज्य सरकार ५० हजार रुपये देईल आणि प्रत्येक घरावर सौर ऊर्जेचा वापर करून त्यांना मोफत वीज उपलब्ध होईल. याच पद्धतीने सुंदर घरे उभारून गृहनिर्माण क्षेत्रात ‘सोलापूर पॅटर्न’ तयार झाला आहे. एखाद्या खाजगी विकासकाच्या प्रकल्पालाही लाजवेल अशी घरे उभारण्यात आली आहे. सोलापूरने महाराष्ट्राला गरजूंना कमी खर्चात दर्जेदार घरे देण्यासंदर्भात दिशा दाखवली आहे, अशा शब्दात श्री.फडणवीस यांनी प्रकल्पाचे कौतुक केले.
मराठा समाजात दीड लाख उद्योजक तयार
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळानतर्फे धनादेश वितरणासंदर्भात बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, महामंडळाने अडीच हजार लोकांना कर्ज देऊन स्वावलंबी उद्योजक होण्यास मदत केली आहे. या महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजात उद्योजक तयार करायचे आहेत. महामंडळाच्या माध्यमातून राज्यात १ लाख ५२ हजार उद्योजक तयार झाले असून आणि सुमारे १३ हजार कोटी उपलब्ध करून दिले आहेत. इतरांना रोजगार देणारा उद्योजक उभा रहात असल्याचे समाधान असल्याचे श्री.फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात घरकूलाच्या १० लाभार्थ्यांना चावीचे वितरण करण्यात आले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे ४ लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या धनादेशाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सोलापूर सोशल फाऊडेशनतर्फे आयोजित होणाऱ्या सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरणही श्री.फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला माजी आमदार राजेंद्र राऊत, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त डॉ.सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे सह मुख्य अधिकारी विजय वाघ, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे, राष्ट्र तेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रीय समाज महालक्ष्मी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास घरकुल लाभार्थी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे यांनी आभार मानले.



Post a Comment
0 Comments