पंढरपूर (दि 13) - बालाजी फुगारे.
गटसाधन केंद्र पंचायत समिती पंढरपूर यांच्या वतीने महसूल पंधरवडा सप्ताहाचे औचित्य साधत तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप (दि.12) रोजी पंचायत समिती शिक्षण विभाग या ठिकाणी करण्यात आले. सदर कार्यक्रम तहसीलदार सचिन लंगोटे ,गटविकास अधिकारी सुशील संसारे,सहाय्यक गटविकास अधिकारी भोंग,शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.दिव्यांगासाठी महान कार्य करणारे लुईस ब्रेल व हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
अलीमको (ALIMCO) संस्थेमार्फत प्राथमिक शिक्षण विभाग,जिल्हा परिषद सोलापूर तर्फे जिल्हास्तरीय शिबिरामध्ये या विद्यार्थ्यांना साहित्य साधने संदर्भित करण्यात आले होते.या शिबिरामध्ये दिव्यांग एकूण 35 साहित्यांचे वाटप करण्यात आले.यामध्ये क्रचेस - 6,रो लेटर - 3,श्रवण यंत्र - 10,व्हील चेअर - 10,सी.पी चेअर -6 असे साहित्य वाटप करण्यात आले.
सदर साहित्याच्या वापराने दिव्यांग मुलांच्या शिक्षणामधील अडथळे दूर होवून सर्वसामान्य मुलांसोबत शिक्षणाची गोडी लागणार आहे.साहित्य मिळाल्याचा आनंद विद्यार्थी व पालकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र मस्के यांनी केले तर सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयश्री स्वामी,वैशाली पवार, मिलिंद कुलकर्णी,अक्षय वाघमारे,महेश इंगळे या विशेष शिक्षकांनी परिश्रम घेतले.
फोटो - दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करताना तहसीलदार सचिन लंगोटे ,गटविकास अधिकारी सुशील संसारे,सहाय्यक गटविकास अधिकारी भोंग,शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे

Post a Comment
0 Comments