चळे तालुका पंढरपूर येथील वासुदेव भास्करराव गायकवाड यांना पुणे विभागातील महाराष्ट्र शासनाचा 2022 चा सेंद्रिय शेतीचा कृषिभूषण पुरस्कार काल जाहीर करण्यात आला आहे.वासुदेव गायकवाड हे गेले पंधरा वर्षापासून विषमुक्त शेती करत आहेत विना रसायन विना फवारणी विना खुरपणी या तत्त्वानुसार त्यांचे 30 एकर वरती आंबा व सिताफळ या फळबागांची लागवड आहे.
सुरुवातीच्या काळात गायकवाड हे द्राक्ष, डाळिंब ,कलिंगड, टोमॅटो, ऊस, तुरी, अशी पिके पूर्वी रासायनिक पद्धतीने घेत होते.निर्यातक्षम द्राक्षउत्पादन ही घेत होते.
रासायनिक शेती करत असताना वाढत जाणारी कामे,वाढत जाणारा खर्च,घटत जाणारे उत्पन्न आणि यामुळे वाढणारे मानसिक अस्वास्थ्य अनुभवल्यानंतर वेगळा मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आणि
बळीराजा मासिक मधील दाभोलकर ,पाळेकर यांचे लिखाण वाचलेअन् एक दिवशी मासानोबू फूकुओका यांचे 'एका काडातून क्रांती'हे पुस्तक वाचले आणि वासुदेव गायकवाड यांच्या विचारात क्रांतिकारक बदल झाला आणि तेव्हापासून गायकवाड यांनी नैसर्गिक शेती करण्याचे ठरवले.
मी विष खाणार नाही व कोणाला खाऊ देणार नाही या तत्त्वानुसार वासुदेव गायकवाड हे मागील पंधरा वर्षांपासून पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने आंबा व सिताफळ या पिकांचे चांगले उत्पादन घेत आहेत.आंबा नैसर्गिक पद्धतीने पिकवूनच त्याची ते विक्री करतात.त्यांच्या आंब्याला सोलापूर जिल्ह्यासह पुणे येथेही खूप मागणी असते.
वासुदेव गायकवाड हे पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिशदादा गायकवाड यांचे बंधू आहेत. वासुदेव गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाचा मानाचा सेंद्रिय शेतीचा कृषिभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल कृषी विभागाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


Post a Comment
0 Comments