पंढरपूर - प्रतिनिधी (ता.22)-
आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री अशा चार प्रमुख यात्रा पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात भरतात. त्यापैकी माघी यात्रा संपन्न होत असून, माघ शुद्ध त्रयोदशीला श्री विठ्ठल सभामंडप येथे ह.भ.प. औसेकर महाराज यांच्या चक्रीभजनाची परंपरा आहे. 22 फेब्रुवारी रोजी दु.2.00 ते 5.00 या वेळेत विठ्ठल रुक्मिणी सभामंडपात येथे सदगुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांचे चक्रिभजन संपन्न झाले. यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे, व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते.
शके १७१८ पासून आजपर्यंत चक्रीभजनाची परंपरा देगुलरच्या गुरुगुंडा महाराजांपासून संस्थांनचे मुळ पुरुष सदगुरु विरनाथ महाराज यांना मिळाली.चक्रीभजन म्हणजे संसाराच्या चक्रातून,भयातून मुक्त करणारे भजन आहे.या परंपरेमध्ये काही बसून तर काही उभारुन भजन केले जाते. हे भजन नृत्य करत केले जाते. देहाची विदेही अवस्था प्राप्त करुन देते. औसेकर घराण्याची 1792 सालापासून माघ वारी काळात श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या सेवार्थ चक्री भजनाची परंपरा सुमारे 244 वर्षापासून ही सेवा अखंडपणे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी देण्याचे काम औसेकर घराण्यातून केली जाते. या चक्री भजनाच्या माध्यमातून 14 भजन म्हणले जातात. चक्री भजनामध्ये वारकरी संप्रदाय पूर्णपणे रंगून जातो असे औसा संस्थांनचे अध्यक्ष तथा मंदिर समितीचे सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

Post a Comment
0 Comments