पंढरपूर, (दि. ४ )– बालाजी फुगारे
25 जुलै रोजी संपन्न होणाऱ्या आषाढी एकादशीच्या सोहळ्याची जय तयारी पंढरपूरमध्ये सुरू असून प्रशासन या यात्रेसाठी जोरदार तयारीला लागले आहे. आषाढी एकादशी सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय ते आज आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आढावा बैठक घेतली.आषाढी यात्रेसाठी पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी भाविक येत असतात. पालखी मार्गावर तसेच आषाढी यात्रा कालावधीत पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या गर्दीतून वारकरी भाविकांना आरोग्य सुविधा तात्काळ मिळाव्यात यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका, बाईक ॲम्बुलन्सचा वापर करण्यात येतो. यावर्षीपासून अत्यावश्यक रुग्णांकरिता नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांना पालखी मार्ग व तळांवर देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे, ऑनलाईनव्दारे आमदार अभिजीत पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, नगराध्यक्षा प्रणिता भालके, पंचायत समिती सभापती शुभम आगवणे, अपर जिल्हाधिकारी गणेश नि-हाळी, कार्यकारी अभियंता अमित निमकर, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तथा आयुक्त संजय काटकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, “वारकरी वारीसाठी घरातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा घरी पोहोचेपर्यंत आरोग्याच्या सर्व आवश्यक सुविधा पुरवण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. त्या नियोजनाप्रमाणे सर्व सेवा पुरवाव्यात. वारी कालावधीत भाविकांना डिजिटल आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत. ‘आरोग्य संपन्न वारी’ व ‘वारी सहाय्य’ या माध्यमातून पालखी मार्गावर वारकरी भाविकांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असून, यामध्ये प्रत्येक आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांच्यामार्फत माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.पालखी मार्गावर एकूण ३५३ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर दिंडी प्रमुखांना प्राथमिक औषधोपचार किटचे वाटप करण्यात येणार आहे. वारकरी भाविकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी ३ हजार ८७ वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी तसेच फिरते मनुष्यबळ उपलब्ध राहणार आहे. त्याचबरोबर ३०२ विशेष तज्ज्ञांची नेमणूक करण्यात येणार आहे.
बैठकी नंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली. व रुग्णालयाची स्वच्छता पाहिली. तसेच रुग्णांशीही संवाद साधून त्यांना मिळत असलेल्या आरोग्य सुविधांची माहिती घेतली. तसेच आरोग्य अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या

Post a Comment
0 Comments