पंढरपूर(दि.30) – बालाजी फुगारे
पंढरपूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दररोज सायंकाळी ६ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत कृषी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र, पंढरपूर तालुक्यात अद्यापही सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत वीजभारनियमन सुरू असल्याचे चित्र असल्याने पालकमंत्र्यांच्या सूचनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी नेमकी कधी होणार, असा सवाल शेतकरी व वीजग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.
सोलापूर येथील नियोजन भवनात आयोजित बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय महावितरण अधिकाऱ्यांना कृषी फिडरवरील वीजपुरवठा सायंकाळी ६ ते रात्री ८.३० या कालावधीत कोणत्याही परिस्थितीत सुरळीत ठेवण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना या वेळेत वीज अत्यावश्यक असल्याने त्यांची गैरसोय होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
बैठकीत महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी जिल्ह्यातील वीजपुरवठ्याची माहिती देताना रात्री कृषी फिडरवर मोठा भार येत असल्याने काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित होत असल्याचे सांगितले. मोठ्या वाड्या-वस्त्यांसाठी स्वतंत्र फिडर उभारल्यास ही समस्या कमी होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पंढरपूर तालुक्यात मागील दोन दिवसांत चांगला पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे कृषी पंप बंद आहेत. अशा परिस्थितीतही सायंकाळच्या वेळेत वीजभारनियमन का सुरू ठेवले जात आहे,? असा प्रश्न वीजग्राहकांकडून विचारला जात आहे. पालकमंत्र्यांच्या स्पष्ट निर्देशांनंतरही परिस्थितीत बदल न झाल्याने महावितरणचे अधिकारी याबाबत कोणती भूमिका घेतात आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नेमकी कोणती उपाययोजना करतात, याकडे पंढरपूर तालुक्यातील शेतकरी व वीजग्राहकांचे लक्ष लागून राहिले आहे
Post a Comment
0 Comments