Type Here to Get Search Results !

स्व.अप्पासाहेब चव्हाण प्रतिष्ठानचे कार्य समाजाला दिशादर्शक - उमेशराव परिचारक


पंढरपूर (दि.12) प्रतिनिधि- 

      आजच्या काळामध्ये निस्वार्थ भावनेने समाजसेवा करणारी मंडळी दुर्मिळ होत आहेत,अशा परिस्थितीमध्ये अशा निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्यांचा सन्मान करणारे स्व.आप्पासाहेब चव्हाण प्रतिष्ठान हे समाजाला दिशा देणारे आहे.असे प्रतिपादन युटोपियन शुगरचे चेअरमन उमेशराव परिचारक यांनी केले. ते स्व.आप्पासाहेब चव्हाण सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने स्व.आप्पासाहेब चव्हाण सर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आयोजित स्मृती पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती वामनराव माने उपस्थित होते.

       कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्व.आप्पासाहेब चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. रविराज सोनार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रताप चव्हाण यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका विशद केली. याप्रसंगी बोलताना उमेशराव परिचारक पुढे म्हणाले, की आप्पासाहेब चव्हाण सरांनी शिक्षण, समाजकार्य व साहित्याच्या क्षेत्रात जो ठसा उमटवला आहे व जे संस्कार पुढच्या पिढीमध्ये निर्माण केले आहेत, याच गोष्टींचा वारसा या प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालविला जात आहे. प्रतिष्ठानचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे.

              या प्रसंगी प्रमुख अतिथी ह.भ.प.मदन महाराज हरिदास, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाषराव माने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन हरीषदादा गायकवाड यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात वामनराव माने यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करत या कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

            प्रतिष्ठानच्या वतीने   मान्यवरांच्या शुभहस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल सुलाखे हायस्कूल बार्शी येथील कलाशिक्षक रामचंद्र इकारे, शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल उत्तरेश्वर महाविद्यालय केम येथील प्रा.डॉ.मच्छिंद्रनाथ नागरे तर सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल सोलापूर येथील भालचंद्र साखरे यांना स्व.आप्पासाहेब चव्हाण स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी तसेच 

याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला. स्वरांजली रामचंद्र वाघ (श्री.दर्लिंग विद्यामंदिर चळे) ,शुभम संतोष राज्योपाध्याय (रांझणी विद्यामंदिर रांझणी),सुमित विष्णू वाघमारे (मा.सरूबाई माने विद्यालय भटुंबरे),सोनाली परमेश्वर कोले (वामनराव माने प्रशाला भैरवनाथवाडी ना. चिंचोली),अमृता दादा नलवडे (यशवंत विद्यालय पंढरपूर),गायत्री सोमनाथ जाधव (कवठेकर प्रशाला नाथ चौक),आर्या अनिल बहिरवाडे (क.औ.पा.विद्यालय), करण वतपाल (प्रोग्रेस माध्यमिक विद्यालय)या गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचाही गौरव करण्यात आला. याप्रसंगी रामचंद्र इकारे व कु.सोनाली कोले यांनी मनोगते व्यक्त केली. डॉ.सचिन लादे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रशांत पाटील यांनी आभार मानले 

              हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.




फोटो पुरस्कार प्राप्त मान्यवर व्यक्ती,विद्यार्थी यांच्या समवेत प्रमुख पाहुणे व प्रतिष्ठानचे पदाधिकारी.

Post a Comment

0 Comments