चळे (ता. पंढरपूर) येथील राजमाता जिजाऊ महिला पतसंस्था मर्या.पंढरपूरच्या चेअरमन चंद्रभागा रामदास घाडगे यांना सुर्योदय परिवार व सूर्योदय उद्योग समूह – सूर्योदय फाऊंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा ‘दुर्गाशक्ती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सांगोला येथे आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. चंद्रभागा घाडगे यांनी गेल्या १३ वर्षांपासून पंढरपूर तालुक्यात राजमाता जिजाऊ महिला पतसंस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला व बचत गटांना आर्थिक मदत करून त्यांना स्वावलंबी बनविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल. संस्थेच्या सर्व संचालक मंडळांनी व डॉ.रामदास घाडगे मित्रपरिवार यांच्या वतीने चेअरमन चंद्रभागा घाडगे यांचे अभिनंदन होत आहे.
फोटो – चंद्रभागा घाडगे,चेअरमन राजमाता जिजाऊ पतसंस्था, मर्या.पंढरपूर
सांगोला तालुक्यातून सुरुवात करून संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या सूर्योदय उद्योग समूह व सूर्योदय फाऊंडेशन यांच्या वतीने दरवर्षी महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव केला जातो. या उपक्रमासाठी संस्थापक अनिलभाऊ इंगवले तसेच सहसंस्थापक जगन्नाथ भगत गुरुजी, सुभाष दिघे गुरुजी व डॉ. बंडोपंत लवटे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची “Give To Gain” ही संकल्पना उदारता, सहकार्य आणि परस्पर समर्थनाच्या भावनेला अधोरेखित करणारी आहे. महिलांचे सबलीकरण आणि समाजातील समानतेचा संदेश देण्याच्या उद्देशाने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.हा पुरस्कार सोहळा रविवार, दि. १५ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ वाजता, सूर्योदय बँक्वेट हॉल, सूर्योदय मॉलच्या पाठीमागे, वाढेगाव रोड, सांगोला येथे मान्यवरांच्या उपस्थिती संपन्न होणार आहे.

Post a Comment
0 Comments