Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा मोठा आदर्श! बक्षिसाची रक्कम पाण्याच्या टाकीसाठी देत विद्यार्थ्यांनी घडवला प्रेरणादायी उपक्रम

चळे(दि.25) बालाजी फुगारे.

  १९ फेब्रुवारी  शिवजयंती निमित्त शिवप्रतिष्ठान आंबे,यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य वैयक्तिक व ग्रुप डान्स स्पर्धांमध्ये पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोळी वस्ती आंबे येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी तिसरा क्रमांक पटकावत रुपये २,००० चे रोख बक्षीस मिळवले.मात्र बक्षीस वितरण सोहळ्यात घडलेली घटना सर्वांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू आणणारी ठरली. विद्यार्थ्यांनी वैयक्तिकरित्या बक्षिसाची रक्कम स्वीकारण्यास नम्रपणे नकार देत, “आमच्या शाळेतील पाण्याची टाकी फुटली आहे; त्या ऐवजी नवीन पाण्याची टाकी आणा,” अशी विनंती शिक्षकांकडे केली. विद्यार्थ्यांच्या या प्रगल्भ विचारांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


बक्षीसाच्या रकमेमधून शाळेमध्ये आणलेल्या नवीन टाकी समवेत विद्यार्थी व मुख्याध्यापक संतोष कोळी.

विद्यार्थ्यांच्या आग्रहानुसार ५०० लिटर क्षमतेची नवीन पाण्याची टाकी खरेदी करून ती शाळेत बसविण्यात आली. या टाकीची किंमत रुपये २,१०० असून फिटिंग साहित्य व बसविण्याचा खर्च रुपये ३०० असा एकूण रुपये २,४०० खर्च आला. उर्वरित रुपये ४०० शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष कोळी यांनी स्वतः देऊन हा उपक्रम पूर्णत्वास नेला.सध्या शाळेत एकूण ३५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये १७ मुली व १८ मुले आहेत. लहान वयातच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून शाळेच्या हितासाठी निर्णय घेणाऱ्या या चिमुकल्यांनी खऱ्या अर्थाने ‘शिवजयंती’चा संदेश आचरणातून दाखवून दिला आहे.


फोटो – विद्यार्थ्यांना गोड उसाचा रस देऊन मुख्याध्यापक संतोष कोळी यांनी शाळेमध्ये पाण्याची टाकी आणल्याचा आनंद साजरा केला.

विद्यार्थ्यांच्या या प्रेरणादायी कृतीबद्दल त्यांचे कौतुक करण्यासाठी सर्व मुलांना ऊसाचा गोड रस पाजण्यात आला. या उपक्रमामुळे शाळेतील वातावरण आनंदमय झाले असून गावकऱ्यांकडूनही विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.लहानग्यांनी दाखवलेला हा आदर्श नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

" गावातील डान्स स्पर्धेत विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळवला होता.मात्र बक्षीसाच्या रकमेमधून शाळेसाठी नवीन पिण्याच्या पाण्याची टाकी आणण्याची कल्पना विद्यार्थ्यांना सुचली, विद्यार्थ्यांची ती कल्पना प्रत्यक्षात आणली. विद्यार्थ्यांना उसाचा रस पाजून शाळेत आनंद साजरा करण्यात आला." – श्री.संतोष कोळी, मुख्याध्यापक कोळी वस्ती शाळा आंबे,


Post a Comment

0 Comments