Type Here to Get Search Results !

उपमुख्यमंत्री फडणवीस आज मंगळवेढ्याच्या दौऱ्यावर आमदार समाधान आवताडे यांना राजकिय ताकद देणार?

पंढरपूर (दि.7) बालाजी फुगारे.



     विधानसभेचा बिगुल वाजण्यास काही महिन्यांचा अवधी आहे.अवघ्या काही दिवसांवरती आचारसंहिता येऊन ठेपली आहे. आचारसंहिता लागू होण्या अगोदरच मतदारसंघांमध्ये विकास कामाचा धडाका अनेक ठिकाणी सुरू आहे.पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी समाधान आवताडे यांनी अनेक वर्षांचा प्रलंबित असणारा मंगळवेढा पाणी उपसा सिंचन योजनेचा प्रश्न तसेच पंढरपूर येथील एमआयडीसी प्रश्न निकालात काढला असून त्या कामाचा भूमिपूजनचा उद्घाटन सोहळा आज राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी अडीच वाजता मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथे होणार आहे.

      पंढरपूर मंगळवेढा ची जागा पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून भाजपने खेचून आणली होती.पोटनिवडणुकीमध्ये भाजपने विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी समाधान आवताडे यांना मदत केली होती. मात्र निवडणूक झाल्यानंतर वर्षभरातच परिचारक गट व अवताडे गट यांच्यामध्ये दरी निर्माण झाली आहे. विधानसभा 2024 च्या अनुषंगाने दोन्ही गटांनी मागील वर्षापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. त्या पंढरपूर मंगळवेढ्याची जागा महायुतीत भाजपला सुटली तर विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर परिचारक यांच्या समर्थकांनीही भाजपकडे प्रशांत परिचारक यांच्या उमेदवारीची मागणी केली आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये प्रशांत परिचारक यांच्या पांडुरंग परिवाराची ही मोठी ताकद आहे.त्यामुळे सध्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये भाजपसाठी प्रशांत परिचारक यांची उमेदवारी अडचणीची ठरत आहे. यावर आता फडणवीस नेमके काय करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. 

      आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मतदार संघात सुमारे 1100 कोटी रुपयांच्या विविध विकास कामाचा शुभारंभ होणार आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत,जलसंधारण मंत्री संजय राठोड सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पोट निवडणूक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी मोठा निधी दिला होता. त्याच निधीच्या जोरावर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे आज मार्गी लागत असल्याने अवताडे यांना मोठी ताकद मिळाली आहे. मात्र येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने फडणवीस अवताडे यांना पंढरपूर मंगळवेढा साठी कोणती राजकीय ताकद देणार याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


Post a Comment

0 Comments