राज 'का'रण - बालाजी फुगारे
येत्या महीन्याभरात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यानंतर मात्र महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसेल. महायुती व महाविकास आघाडी जोरदारपणे आमने-सामने आलेल्या दिसतील. निवडणूकी दरम्यान अनेक आरोप-प्रत्यारोप होतील खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर टीका केल्या जातील. निवडणुकीचा निकाल आल्यानंतर मात्र दोन्ही आघाड्यांना बहुमत न मिळाल्यास? त्रिशंकू अवस्था निर्माण होईल. अशा परिस्थितीत महायुती व महाविकास आघाडी टिकेल की नाही? याची कोणतीही हमी आज देता येत नाही.
त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी 2019 सारखी परिस्थिती निर्माण झाल्यास नवल वाटणार नाही.राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो हे अनेक वेळा आपण बघितले आहे.येणारया विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात,मुख्यमंत्री पदावरून किंवा ते पद मिळविण्यासाठी अनेक नाट्यमय घडामोडी घडू शकतात. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जातील हे जवळपास निश्चित आहे. याचाच अर्थ महायुती व महाविकास आघाडी निवडणुकीपूर्वी तुटतील किंवा वेगळे लढतील अशी शक्यता आजघडीला दिसत नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप - शिवसेना युतीला पुर्ण बहूमत मिळाले होते. पण मुख्यमंत्री पदावरून भाजप- शिवसेनेत बिनसलं आणि शिवसेनेने भाजपबरोबरची युती तोडून काँग्रेस - राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले होते. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालती पाहायला मिळाल्याआहेत.
काही शक्यता विचारात घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे किंगमेकर च्या भूमिकेत येऊ शकतात, शरद पवार, हे आपली कन्या सुप्रिया सुळे, यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे करून वेगळ्या आघाडीची मांडणी करु शकतात.यामध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका ही महत्त्वपूर्ण असू शकते. भाजपच्या पाठिंब्याने सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झाल्यास त्या बदल्यात शरद पवार यांच्या आठ खासदारांचा पाठिंबा केंद्रातील 'एनडीएच्या' सरकारला मिळू शकतो. त्यामुळे 'एनडीए' सरकारच्या खात्यात आणखी आठ खासदारांचे बळ वाढू शकते. अर्थातच ही समीकरणे विधानसभा निवडणुकीचे निकाल त्रिशंकू आल्यास किंवा मुख्यमंत्री पदावरून महायुती व महाविकास आघाडी मध्ये काही उलतापालती झाल्यास शक्य होतील.शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकते याचा अनुभव आपण गेल्या पाच वर्षाच्या काळात सातत्याने घेत आलो आहोत.

Post a Comment
0 Comments